जांबुत (वार्ताहर) : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा हौदोस सतत सुरूच आहे. पिंपरखेड आणि जांबुत परिसरात नुकतेच घडलेल्या हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच, आता फाकटे (ता. शिरूर) येथेही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक शेतकरी महेश देवराम टेके यांच्या कालवडीवर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला असून, त्या हल्ल्यात कालवड जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सामाजिक कार्यकर्ते शंकर उर्फ नितीन पिंगळे यांनी पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. घटनेनंतर वनविभागाने तातडीने तीन पिंजरे लावले असून, या भागात दहा ते पंधरा बिबटे फिरत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हल्ले करणाऱ्या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अगदी आठ दिवसांपूर्वी याच गावातील सारिका लक्ष्मण राऊत या महिला सकाळी साडेसहा वाजता हिटर चालू करण्यासाठी बाहेर गेल्या असता, सोलर पंपाच्या प्लेटखाली दबा धरून बसलेल्या बिबट्याला त्यांनी पाहिले. आरडाओरड करत त्यांनी घराकडे पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या. गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी आणि महिला वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाला इशारा दिला आहे की, “घटना घडल्यावर नव्हे, तर आधीच ठोस उपाययोजना करा,” अन्यथा मोठा अनर्थ ओढवू शकतो.