जांबूत परिसरात बिबट्याचा हल्ला: शेतकऱ्यांमध्ये भीती, वनविभागाकडे उपाययोजनांची मागणी

जांबूत: शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द या बेट भागात गेल्या पाच वर्षांपासून बिबट्याचा हौदोस वाढला आहे. मागील दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो पशुधन धोक्यात आले आहे. पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मागील दोन दिवसांत पिंपरखेड येथील शेतकरी भिमाजी गायकवाड यांच्या दोन शेळ्या आणि बबन बोंबे यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या भागात अशा घटना वारंवार घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शेतीच्या मशागतीचे दिवस सुरू असून, उसाच्या शेतात अन्न-पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मुक्त संचार दिसतो. काहीवेळा तीन-चार बिबटे एकाच वेळी दिसतात. विशेषतः जून ते सप्टेंबर या काळात अशा घटना वाढतात.
शेतकरी वनविभागाकडून घटना घडण्याआधीच उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन मृत्यूमुखी पडल्यास शेतकऱ्यांना वनविभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वैद्यकीय अहवालासाठी शेतकऱ्यांना शिरूर किंवा तळेगाव येथे जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. वनविभागाने घटनास्थळी तात्काळ अहवाल देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे म्हणाले, “घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे माहिती देण्याची सुविधा आहे. आवश्यकतेनुसार पिंजरे लावले जातील.” तथापि, शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा धोका कमी करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





