Lek Ladki Yojana – राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या जिल्ह्यातील तब्बल ९ हजार ४८२ मुलींना आतापर्यंत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, शिक्षणाला चालना देणे, बालविवाह रोखणे आणि कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. पुणे जिल्हा परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार, योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी (प्रतिलाभार्थी ५ हजार रुपये) २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये, तर २०२५-२६ या वर्षात आतापर्यंत २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेचे स्वरूप अत्यंत कल्पक असून, मुलीच्या जन्मापासून ती सज्ञान होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यात जन्मानंतर ५ हजार, पहिलीत गेल्यानंतर ६ हजार, सातवीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला ७५ हजार रुपये मिळतात. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत, अट केवळ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आनंद खंडागळे यांनी केले आहे.