राहुल गांधींचा केंद्रावर हल्ला, ‘मोदीजी, तुम्ही लडाखला धोका दिला, घाबरवू नका… निष्पक्ष चौकशी करा’

Leh Firing Ladakh Latest Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लडाखमधील लेह येथे झालेल्या हिंसाचारात चार नागरिकांसह एका माजी सैनिकाच्या हत्येच्या प्रकरणात निष्पक्ष न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. करगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए)नेही सरकारच्या आरोपांना खोडून काढत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह सर्व अटक केलेल्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओसह लिहिले, “वडील सैनिक, मुलगाही सैनिक… ज्यांच्या रक्तात देशभक्ती आहे, अशा देशाच्या वीर पुत्राला भाजप सरकारने गोळी घालून ठार केले, फक्त कारण तो लडाख आणि आपल्या हक्कांसाठी उभा राहिला होता. वडिलांच्या डोळ्यांतील वेदना एकच प्रश्न विचारत आहेत- देशसेवेचा हा सन्मान आहे का?”
पिता फौजी, बेटा भी फौजी – जिनके खून में देशभक्ति बसी है।
फिर भी BJP सरकार ने देश के वीर बेटे की गोली मारकर जान ले ली, सिर्फ इसलिए क्योंकि वो लद्दाख और अपने अधिकार के लिए खड़ा था।
पिता की दर्द भरी आंखें बस एक सवाल कर रही हैं – क्या आज देशसेवा का यही सिला है?
हमारी मांग है कि… pic.twitter.com/cJqKstISjg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 30, 2025
न्यायिक चौकशीची मागणी –
राहुल गांधी यांनी पुढे लिहिले, “लडाखमधील या हत्यांची निष्पक्ष न्यायिक चौकशी व्हायलाच हवी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी. मोदीजी, तुम्ही लडाखच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. ते आपले हक्क मागत आहेत, संवाद साधा, हिंसा आणि भीतीचे राजकारण थांबवा.” त्यांनी त्सेरिंग नामग्याल यांचा व्हिडिओ शेअर केला, ज्यांचा 46 वर्षीय मुलगा त्सेवांग तार्चिम हा लडाख पोलिस आणि सीआरपीएफच्या गोळीबारात मारला गेला. त्सेरिंग यांनी म्हटले, “जर एसएसपी किंवा डीसी यांचा मुलगा मारला गेला असता, तर त्यांना कसे वाटले असते? गरीबाचा मुलगा मारणे त्यांना सोपे वाटते. त्यांच्या मुलांना मारले असते, तर ते सहन करू शकले नसते.” त्यांनी 32 वर्षे सैन्यात सेवा केल्याचेही सांगितले.
पोलिसांचा दावा –
लडाखचे पोलिस प्रमुख एस. डी. सिंह जामवाल यांनी शनिवारी दावा केला की, 5,000-6,000 लोकांच्या जमावाने अर्धसैनिक दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आत्मरक्षेसाठी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात जिगमेट दोर्जे (25), स्तान्झिन नामग्याल (23) आणि रिंचेन दाडुल (20) या तीन तरुणांचाही मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) अटक करण्यात आली असून, त्यांना जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तार्चिम हा लडाखच्या सहाव्या अनुसूचीसाठी भूक हडताल करणाऱ्या लेहवासीयांपैकी एक होता.
केडीएचा सरकारला इशारा –
करगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी लडाखच्या डीजीपीच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, सोनम वांगचुक यांना पाकिस्तानी एजंट आणि हिंसा भडकवणारा ठरवणे हे “पुराव्याविना” केलेले निराधार आरोप आहेत. केडीएने निष्पक्ष न्यायिक चौकशी, हिंसाचारात सहभागी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि वांगचुक यांच्यासह सर्व अटक तरुणांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली. तसेच, सहावी अनुसूची आणि संवैधानिक संरक्षण ही त्यांची मुख्य मागणी असून, यावर कोणतीही तडजोड होणार नाही, असेही केडीएने स्पष्ट केले. लेह एपेक्स बॉडी आणि केडीए आता एकत्र येऊन लडाखच्या मुद्द्यांसाठी लढत आहेत.
चौकशी न झाल्यास वाढेल अविश्वास –
लेह गोळीबार प्रकरणाने केंद्र आणि लडाखच्या जनतेतील अविश्वास आणखी गडद केला आहे. सरकारने आत्मरक्षेचा दावा खरा ठरवायचा असेल, तर पारदर्शी आणि निष्पक्ष चौकशी टाळता येणार नाही. सामान्य पोलिस चौकशीवर जनतेचा विश्वास कमी आहे, विशेषत: जेव्हा आरोप स्वतः पोलिसांवर आहेत. या घटनेने लडाखच्या राज्याच्या दर्जाची मागणी अधिक संवेदनशील बनवली आहे. जेव्हा नागरिक, विशेषत: तरुण पिढी, सरकारवर सन्मानाऐवजी गोळ्या चालवल्याचा आरोप करते, तेव्हा हे प्रकरण फक्त आंदोलनापुरते मर्यादित राहणार नाही. केडीए आणि लेह एपेक्स बॉडीसारख्या संघटनांनी निष्पक्ष चौकशी आणि हक्कांची मागणी करणे स्वाभाविक आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने या संघटनांच्या आवाजाला अधिक बळ मिळाले आहे.
केंद्रापुढे रणनीतिक संकट
लडाख हे केंद्र सरकारसाठी रणनीतिक संकट बनले आहे. कठोर भूमिका घेतल्यास लडाखी जनतेचा रोष वाढू शकतो. संवादाचा मार्ग स्वीकारला, पण त्यात विश्वास आणि न्यायाची हमी नसेल, तर परिस्थिती स्थिर होणार नाही. केंद्राने संयम आणि संवेदनशीलता दाखवत जबाबदारी स्वीकारून पारदर्शी चौकशी करावी आणि शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा आहे.





