विधानसभेसाठी शिंदे गटही सरसावले ; 46 प्रभारी, 93 निरीक्षकांची नियुक्ती, ‘एवढ्या’ जगांसाठी आग्रही

Legislative Council Elections | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसलीय. अद्याप निवडणुकांची घोषणा झालेली नाही, पण तरिदेखील जागावाटपावरुन सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाले आहेत. महायुतीत सध्या जागावाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. दरम्यान, आगामी विधानसभेत शिवसेना शिंदे गट 100 जगांसाठी आग्रही असेल, अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्षांना विशेषतः भाजपला दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून शिंदे यांनी आपल्या नेत्यांची फौज तयारीसाठी उतरवली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदेंची मुंबईवर नजर Legislative Council Elections |
जो मुंबईचा गड राखतो, तिच आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर बसते, असे राज्याच्या राजकारणात म्हटले जाते. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीनं मुंबईवर लक्ष केंद्रीय करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून आता शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. एक शिंदेंचा आणि दुसरा ठाकरेंचा. लोकसभा निवडणुकीत तर मुंबईकरांचा कौल ठाकरेंना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता विधानसभेत मुंबईकर कोणाच्या बाजूनं उभे राहणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अशातच आता शिंदेंनीही मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत केलंय.
मुंबईतील 18 जागांसाठी शिंदेंकडून प्रभारींची निवड Legislative Council Elections |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 36 पैकी 18 जागांसाठी निवडणूक प्रभारींची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये माजी नगरसेवक कमलेश राय (चांदिवली, कलिना), मिलिंद देवरा (वरळी, शिवडी), यशवंत जाधव (भायखळा), रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, परभणी, गंगाखेड), राहुल शेवाळे (चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारवी), शिशिर शिंदे (भांडुप पश्चिम, कुर्ला, विक्रोळी, मानखुर्द) यांचा समावेश आहे. तसेच, नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेल्या संजय निरुपम (अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठाणे) यांच्याकडेही प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. यावरुन एकंदरीत शिंदेंनी ठाकरेंकडून मुंबईचा गड हिसकावून घेण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.





