महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा – संभाजीराजे

मुंबई :– महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही. तसेच महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुरू असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, प्रसाद लाड एकीकडे महाराजांना दैवत मानतात आणि दुसरीकडे महाराजांचा अभ्यास ठेवत नाही. भाजपने अशा लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. तरीही नाही ऐकले, तर यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलले पाहिजे.
तसेच राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत त्यांना राज्याबाहेर हाकलले जात नाही तोपर्यंत स्वराज्य संघटना लढणार आहे. एवढे सगळे लोक महाराजांबद्दल बोलत असताना भाजप ठाम भूमिका का घेत नाही. यातून भाजपचा दुटप्पीपणा दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
Samruddhi Mahamarg : राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजप आमदार मंगलप्रभात लोढा आणि आता आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वक्तव्ये केल्याने ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.





