भारताचा एक महत्त्वाचा शेजारी असलेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतिपदी डाव्या विचारसरणीच्या अनुरा कुमारा दिसनायके यांची नियुक्ती झाल्यामुळे उपखंडातील राजकारणावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. ज्याप्रकारे दिसनायके यांच्या पक्षाने श्रीलंकेतील आतापर्यंतच्या पारंपरिक पक्षांना बाजूला सारून डाव्या विचारसरणीच्या आपल्या पक्षाला राष्ट्रपतिपदावर बसवले आहे ते पाहता श्रीलंकेतील जनतेलाही अशा प्रकारचा बदल हवा आहे हे दिसून येते. या सर्व घडामोडी घडत असताना भारतासाठी त्या किती महत्त्वाच्या आहेत याचाही विचार करावा लागणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष दिसनायके ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात तो जनता विमुक्त पेरामुना हा राजकीय पक्ष दीर्घकाळापासून डाव्या विचारसरणीकडे झुकलेला आहे. अर्थात, गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दिसनायके यांच्याकडे या पक्षाचे नेतृत्व गेल्यावर त्यांनी काही प्रमाणात लिबरल होण्यास प्रारंभ केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवून त्यात सुधारणा करण्याकडे त्यांनी प्राधान्य दिले असले, तरी देशातील अर्थतज्ज्ञांना मात्र देशाची प्रगती आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्याच्या हातात सत्ता हा विरोधाभास असल्याचे वाटत आहे, हेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. श्रीलंकेमध्ये 2022 मध्ये ज्या प्रकारे जनतेने उठाव करून तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देशाबाहेर हाकलून दिले होते त्यानंतर देशातील परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. देशातील तरुणांना आणि इतरांनासुद्धा आता देशामध्ये बदल हवा अशी जाणीव झाली होती. त्याचेच प्रतिबिंब या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमटले आहे. कारण, या निवडणुकीमध्ये विजयी अध्यक्ष दिसनायके यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानील विक्रमसिंगे यांचा पराभव केलाच. शिवाय गोटाबाया यांच्या पक्षातील नानल राजपक्षे यांचासुद्धा या निवडणुकीमध्ये पराभव केला. म्हणजेच गेली अनेक वर्षे श्रीलंकेतील राजकारण ज्या दोन गटांमध्ये घुटमळत होते त्यातून या राजकारणाला बाहेर काढून श्रीलंकेतील नागरिकांनी एक तिसरा पर्याय निवडल्याचे दिसते. हा डाव्या विचारसरणीचा पर्याय लोकशाहीमध्ये परिणामकारक ठरू शकतो आणि कदाचित श्रीलंकेलासुद्धा फायदेशीर ठरू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये दिसनायके यांनी आपली डावी विचारसरणी काही प्रमाणात मवाळ केली आहे. पण मुळात त्यांचे धोरण चीनधार्जिणे असल्याचेही मानले जाते. त्यामुळे भारतासाठीसुद्धा श्रीलंकेतील हा बदल महत्त्वाचा मानावा लागणार आहे. भारताचे जे प्रमुख शेजारी देश आहेत त्यापैकी बांगलादेश, पाकिस्तान आणि आता श्रीलंका या सर्व देशांमध्ये जर चीनचे वर्चस्व वाढू लागले, तर त्याचा भविष्यात भारताला तोटा होणार आहे हे उघड आहे. अर्थात, सध्याच्या परिस्थितीमध्ये श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष थेटपणे चीनची बाजू घेतील अशी शक्यता नाही. कारण 2022 मध्ये जेव्हा श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज होती तेव्हा भारतानेच ती मदत केली होती आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था सावरली होती. याची जाणीव त्यांनाही आहे आणि त्याबाबत भारताचे आभारही मानले आहेत. पण श्रीलंकेच्या अंतर्गत बाबीमध्ये भारतासह कुठल्याही देशाने लक्ष घालू नये हा मात्र त्यांचा आग्रह असणार आहे. ज्या प्रकारे श्रीलंकेतील तामिळी चळवळीला भारताचा पाठिंबा असल्याचे आरोप आतापर्यंत केले जात होते ते पाहता आणि नवनिर्वाचित अध्यक्षांची तामिळी चळवळीबाबत असलेली कठोर भूमिका पाहता हा एक विषय मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यातील वादाचा मुद्दा भविष्यात बनू शकतो. तामिळींनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करून देशामध्ये संघर्ष करू नये अशा प्रकारची भूमिका दिसनायके यांच्या पक्षाने पूर्वीपासून घेतली असल्याने आणि श्रीलंकेतील तामिळी चळवळीला भारताने पाठिंबा देऊ नये असे स्पष्टपणे बजावले असल्याने हाच एक विषय महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये श्रीलंकेच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचे काम दिसनायके यांनी केले असले तरी त्यांच्यासमोर अशी अनेक आव्हाने आहेत म्हणूनच भारत आणि चीन यांच्याशी संबंध जपताना त्यांना योग्य समतोल साधावा लागणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा श्रीलंकेला चीनपेक्षा भारताची मैत्री जास्त फायदेशीर ठरणार आहे याची कबुली श्रीलंकेतील यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी आणि श्रीलंकेतील तज्ज्ञांनीही दिली आहे. ही निवडणूक होण्यापूर्वी दिसनायके भारताच्या दौर्यावर आले होते आणि त्यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली होती. साहजिकच केवळ मार्क्सवादी विचारसरणीशी बांधिलकी आहे म्हणून ते लगेच भारताशी मैत्री झटकतील आणि चीनचा हात पकडतील असेही नाही. अध्यक्षपद हे एक मोठे आव्हान आहे याची कल्पना त्यांना आहे त्यामुळे एका रात्रीत सर्व बदल त्यांनाही अपेक्षित नाहीत. सध्या तरी श्रीलंकेतील सत्तेत बदल झाला आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. या बदलाचे परिणाम त्या देशामध्ये काय होतात आणि शेजारी असलेल्या भारतासारख्या देशावर काय होतात हेच पाहणे आगामी कालावधीमध्ये औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीलंकेतील जनतेने लोकशाही मार्गाचा वापर करून बदल घडवून एक सक्षम पर्याय समोर आणला आहे हे सध्या सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. दोन वर्षांपूर्वीच्या अराजकानंतर श्रीलंका लोकशाही मार्गाने सावरते आहे हेच खूप विशेष आहे.