Jeeva Subramaniam : स्वतःची ओळख जपण्यासाठी घर सोडलं, अनेक वर्षं एकटेपणात काढली दिवाळी; जीवाची डोळी पाणवणारी पोस्ट चर्चेत
Jeeva Subramaniam : जीवाने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास सांगितला. स्वतःची ओळख स्वीकारण्याच्या काळात तिने दिवाळीच्या अवघ्या चार दिवस आधी घर सोडलं होतं.

Jeeva Subramaniam : दिवाळी म्हटलं की सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं. मात्र, प्रत्येकासाठी हा सण आनंदाचा असेलच असं नाही. अभिनेत्री जीवा सुब्रमण्यम हिच्यासाठी अनेक वर्षं दिवाळी हा सण आनंदाऐवजी एकटेपणा आणि वेदना घेऊन येणारा ठरला.
ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिला कुटुंबापासून दूर व्हावं लागलं होतं. घर सोडल्यानंतर दिवाळीच्या दिवसांत ती स्वतःला घरात कोंडून घेत असे. मात्र, यंदाची दिवाळी तिच्यासाठी खास ठरली आहे. एका चित्रपटामुळे तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण परतले असून, अनेक वर्षांनंतर तिला दिवाळी साजरी करण्याची इच्छा झाली आहे.
जीवाने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास सांगितला. स्वतःची ओळख स्वीकारण्याच्या काळात तिने दिवाळीच्या अवघ्या चार दिवस आधी घर सोडलं होतं. हा निर्णय तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होता. त्यानंतर दिवाळीचा सण तिच्यासाठी एकाकीपणाचा काळ बनला.
तिने पोस्टमध्ये सांगितलं की, “दरवर्षी दिवाळीच्या आधी ती तांदूळ, डाळी आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवत असे. कारण सणाच्या चार दिवसांत तिला घराबाहेर पडायचं नसे. ती घराचे दरवाजे बंद करून स्वतःला एकटं ठेवत असे. लोकांना भेटणं आणि सण साजरा करणं ती टाळायची. केवळ कामानिमित्त शूटिंगसाठीच ती घराबाहेर पडत असे. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.”
View this post on Instagram
‘डोरथी’ चित्रपटामुळे आयुष्यात आला आनंदाचा क्षण
जीवाच्या आयुष्यात हा सकारात्मक बदल घडवण्याचं श्रेय तिने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांच्या ‘डोरथी’ या चित्रपटाला दिलं आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. तिच्या कामाला मिळालेल्या प्रेमामुळे जगभरातून लोकांनी तिला वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रेमामुळे अनेक वर्षांपासून मनात साचलेला एकटेपणा काहीसा दूर झाल्याचं तिने सांगितलं.
विशेष म्हणजे, यंदा जीवाने पहिल्यांदाच स्वतःचा वाढदिवस एकटीने साजरा केला. तिने स्वतःसाठी केक खरेदी केला, तो कापला आणि आनंदाने वाढदिवस साजरा केला. याबाबत तिने सांगितलं की, दुकानात जाऊन स्वतःसाठी केक आणणं आणि एकटीने तो कापून खाणं ही कदाचित छोटी गोष्ट वाटू शकते; पण तिच्यासाठी हा क्षण खूप मोठा आणि आनंद देणारा होता.
कार्तिक सुब्बाराज यांचे मानले विशेष आभार
या संपूर्ण प्रवासात साथ दिल्याबद्दल जीवाने दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांचे विशेष आभार मानले आहेत. तिने त्यांना आपला धाकटा भाऊ संबोधलं. कार्तिक यांनी तिच्यातील अभिनयक्षमता ओळखली आणि तिला स्वतःची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली. या संधीमुळे तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल घडल्याचं तिने नमूद केलं.





