लष्करी करिअर हे धाडसी तरुणांसाठी आवडते क्षेत्र ! एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांचे ‘अग्निपथ’ योजनेवर व्याख्यान

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 – भारतीय सैन्यदलात यापुढील होणारी नव्या आणि युवा सैनिकांची भरती अधिकाधिक प्रशिक्षणावर आधारित, तसेच सक्षमतेच्या आधारावर करण्यासाठी “अग्निपथ’ योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आली. योजनेची घोषणा होऊन तपशील पडताळण्यापूर्वीच “अग्निपथ’ला विरोध होताना दिसला. सैन्यदलाच्या तिन्ही शाखांमधील लष्करी करिअर हे धाडसी तरुणांसाठी आवडते आणि आव्हानपर आहे, असे मत एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांनी व्यक्त केले.
“अग्निपथ’ विषयावर एरंडवण्यातील “ज्येष्ठ नागरिक संघ’ च्या सभागृहात भाषण झाले. बापट यांनी सन 1982 मध्ये भारतीय वायु दलात प्रवेश घेतला. 26 जानेवारी 2020 मध्ये त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदकाने सनमनित करण्यात आले आहे.
नव्या योजनेअंतर्गत 46 हजार अग्निवीरांची चार वर्षे कालावधीसाठी निवड करण्यात येईल. चार वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अग्निवीर उमेदवाराला 11.72 लाख रुपये देण्यात येतील. यापैकी 25% अग्निवीरांना त्यांच्या निवडीच्या आधारे सैन्यदलात निवड करण्यात येईल आणि बाकी अग्निवीरांना त्यांचे कौशल्य आणि प्रशिक्षणाच्या आधारे इतरत्र योग्य नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या दहा अर्धसैनिक दल संस्थांमध्ये आणि त्याखालोखाल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात, रेल्वे सुरक्षा दल, आसाम रायफल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सुरक्षा दल यामध्ये सशस्त्र सैनिक असतात. या विविध अर्धसैनिक दलांमध्ये दरवर्षी नव्या जवान-सैनिकांची आवश्यकता असते व ही आवश्यकता उर्वरित अग्निवीरांना सशस्त्र दलात संधी नक्कीच उपलब्ध करण्यात येईल. गृहमंत्रालयाने अग्निवीरांना वयोमर्यादेची अट शिथिल करण्याच्या जोडीलाच दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे, असे बापट म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे (एरंडवणा) अध्यक्ष श्रीकांत पुराणिक होते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह मुकुंद जोशी, कार्यवाह उर्मिला शेजवळकर आदी उपस्थित होते. यावेळी श्रोत्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन आणि प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली.




