पुणे जिल्हा | शिक्रापूर परिसरात चासकमानचे आवर्तन सोडा

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) परिसरातील राऊतवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने चासकमान कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शिरूर तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देत केली आहे.
शिक्रापूर, राउतवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी येथील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असून सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याने वेळ नदीला पाणी सोडल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी वाढून गावाला पाणीपुरवठा होऊ शकतो.
त्यामुळे वेळ नदीसह राऊतवाडी, कासारी तसेच सणसवाडी तलावासाठी आपण तातडीने वेळ नदीमध्ये चासकमान कालव्याचे पाणी सोडावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शिरूर तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देत केली आहे.





