Marathi Compulsory Auto-Taxi Driver: मराठी शिकावचं लागणार, अन्यथा चालकांचा परवाना होणार रद्द, शासन निर्णय येणार
Marathi Compulsory Auto-Taxi Driver: लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार

Marathi Compulsory Auto-Taxi Driver: महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. मात्र अनेक अमराठी रिक्षा-टॅक्सीचालक हा नियम धुडकावून लावत आहेत.
मराठी न येण्यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद उद्भवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसेल तर त्याला आधीच एका महिन्याची नोटीस देण्यात येईल. त्या एका महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही, तर त्याचे लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे.
यानंतर देखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरदूत या कायद्यामध्ये असणार आहे. आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे.
त्यातूनच सरकारने या कायद्यात सुधारणा करून काही कठोर तरतुदी केल्या आहेत. शासकीय अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत.
मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट
या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये ‘Antecedents’ या शब्दांनंतर “And working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.
मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाचा वाहन परवाना निलंबित अथवा कायमचा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ नव्हे, सुधारित मोटार वाहन नियम
या सुधारणांचा अधिसूचनेत उल्लेख ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ असा करण्यात आला आहे. हे बदल मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे नियमांमधील संदिग्धता दूर होऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे.
प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे आणि सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित करणे यासाठी स्थानिक भाषेचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात या नियमांची अधिक परिणामकारकपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या सुधारित नियमांमुळे मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानाची अट अधिक स्पष्टपणे लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा:
Akshay Kumar : अक्षय कुमार एलियन थ्रिलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; खास ठिकाणी होणार शुटींग






