Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेकडून काहीतरी शिका! उद्धव ठाकरे संतापले; ‘मातोश्री’वरील बैठकीत काय घडलं?
Uddhav Thackeray : बैठकीतील वाद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची यामुळे उबाठा गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

UBT meeting at Matoshree : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा राडा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाल्याचे समजते. यावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले आहेत.
बैठकीतील वाद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची यामुळे उबाठा गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘मातोश्री’वर ठाणे-कल्याण विभागाच्या संघटनात्मक आढावा (Organizational Review of the Thane-Kalyan Division) घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उद्धव ठाकरेंसमोरच बाचाबाची
या बैठकीत जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नव्या नेतृत्वामध्ये पदांवरून वर्चस्वाची चुरस निर्माण झाली असून, त्याचेच पडसाद संघटनात्मक बैठकीत उमटले. यावेळी दोन्ही बाजूच्या गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कॅाक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे उदाहरण देत खडबोल सुनावले.
तसेच मोठ्या राजकीय लढ्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या बैठकीला आमदार मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि माजी आमदार विलास पोटनीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“देशातील परिस्थिती पाहा. अभिजीत दीपकेसारखा एक तरुण कार्यकर्ता आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतोय. आणि तुम्ही मात्र छोट्या पदांसाठी एकमेकांशी काय भांडताय ? ” असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं.
‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. स्थानिक नाराजी रोखण्यासाठी नेतृत्वाकडून कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची बातमी समोर आली होती. काही वृत्तांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबाला ‘मातोश्री’वर भेटीसाठी आंमत्रित केल्याची माहिती समोर आली होती. यावरुन देखील विविध चर्चांना उधाण मिळाले होते.





