मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतरही राष्ट्रवादी एकसंध असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे पक्ष कसा सांभाळायचा हे शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवारांकडून शिकावे, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.
शरद पवारांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरून कोलांटउडीही मारली होती. याविषयी गुलाबराव पाटील यांना छेडले असता त्यांनी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत बाब असल्याचे स्पष्ट केले. नेतेपद ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत गोष्ट आहे. कोण कुणाचे नेते आहेत, हे त्यांच्या पक्षानेच ठरवण्याची गरज आहे, असे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडणारे व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असणारे दोन्ही नेते आम्ही सर्व एकत्रच असल्याचा दावा करत आहेत. याऊलट त्यांचे एकमेकांविरूध्द सभा घेणेही सुरू आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांची विधाने पाहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वकाही एकदिलाने सुरू असल्याचे स्पष्ट होते. तसेच हे सर्व एकमताने झाल्याचेही शिक्कामोर्तब होते, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली. त्यानंतर बीड व कोल्हापूरमध्येही त्यांची सभा झाली. आता अजित पवार यांची बीडमध्ये रविवारी सभा होणार आहे.