satara | कोटेश्वर टाकीला पाणी गळती लाखो लिटर पाणी वाया

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरात पाण्याची तीव्र टंचाई असून शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. मात्र, कोटेश्वर टाकीला कमी दाबाने पाणी येणे आणि गळती लागून पाणी वाया जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गळतीचे पाणी ओढ्यातून वाहून जात असल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.
टाकीचा व्हॉल्व खराब असल्यामुळे पाण्याचे नियमनं करणे अवघड झाले आहे सातारा पालिकेचे पाणी नियोजनाचे धोरण अत्यंत तकलादू स्वरूपाचे असून टाकीचे नळकरी अत्यंत बेजवाबदार पद्धतीने काम करत आहेत. कोटेश्वर टाकीचे व्हॉल्व आणि पाणी नियमन वेळापत्रक बिघडल्यामुळे येथे वाहून जाणारे पाणी ओढ्यात सोडले जात आहे . पिण्याचे लाखो लिटर पाणी ओढ्यात सोडून देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे .
सातारा शहरांमध्ये एकूण पाण्याच्या तेरा टाक्या आहेत त्यातील काही टाकींचे व्हॉल्व लोखंडी असून त्याला गंज पकडला आहे. त्यामुळे नळकऱ्यांना व्हॉल्व फिरवताना प्रचंड कसरत करावी लागते. काही दिवसापूर्वी गुरुवार बाग येथील मिळवणे टाकीला व्हॉल्व खराब होऊन लोखंडी प्लेट पडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. कमी अधिक फरकाने हाच प्रकार आता कोटेश्वर टाकीला होत आहे.
कोटेश्वर टाकीतून शुक्रवार पेठ अर्क शाळा नगर अंजली कॉलनी गडकर आळी कोपरा तसेच कुंभार आळी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. ही पाणीपुरवठा टाकी पाच लाख लिटर क्षमतेची आहे प्रत्यक्षात या टाकीला पूर्ण लेवल मिळत नाही. त्यामुळे या परिसराला पाण्याची तीव्र टंचाई आहे.
कर्मचारी काम करतात की पाट्या टाकतात ?
पाणीपुरवठा विभागातले कर्मचारी काम करतात की केवळ पाट्या टाकतात हे शोधण्याची वेळ आली आहे. सातारा शहराचे नळकरी हे तांत्रिकदृष्ट्या कुशल असले तरी पाण्याच्या टाकीचे वॉल हे जुने असल्यामुळे त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक बनली आहे.
शहापूर कास या दोन्ही पाणी पुरवठा योजनांचे सातारा शहरांमध्ये चाळीसहून अधिक व्हॉल्व आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती महत्त्वाची असून पाणीपुरवठा विभागाने याचा धडक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अनभिज्ञ
गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू असून पावर हाऊसवरून येणारे कासचे पाणी नागरिकांच्या घरात कमी आणि ओढ्याला जास्त जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची कल्पनाच नसल्याचे समोर आले.
मात्र मेळवणे टाकीच्या निमित्ताने शहरातील सर्व टाक्यांचे व्हॉल्व दुरुस्त करणे आणि ते सुटसुटीत पणे हाताळता येतील अशी व्यवस्था करणे याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.





