‘पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमजुरांसाठी एकत्र यावे’ – आमदार बच्चू कडू

नागपूर – गेली 70-75 वर्षे ओबीसी नेते सत्तेत होते, तेव्हा त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केले? असा थेट सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे.
त्यामुळे ओबीसी सभेप्रमाणेच सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमजुरांसाठी एकत्र यावे, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा सल्लाही त्यांनी दिला.
ओबीसी सभेवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, तुम्ही ज्यावेळी 70-75 वर्षे सत्तेत होते तेव्हा ओबीसीसाठी काय केले? कधी धर्माच्या नावानं चांगभलं, तर कधी जातीच्या नावानं चांगभलं. शेतकऱ्यांसाठी लोक पेटवून पेटत नाहीत. मात्र जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे.
येणाऱ्या काळात जातीपातीचे प्रश्न हे अधिक मोठे होणार आहेत. त्यावरून राजकारण होणार आहे, दोन समाजात लढाया लागणार आहे. मात्र प्रत्येक समाजाच्या लोकांना मी विनंती करतो की नेत्यांच्या भाषणावर भडकू नका. तुम्ही भडकले तर राजकारण्यांच भलं होणार आहे. आमचं भलं होण्यापेक्षा तुमचं भलं कशात हे ओळखा, असे आवाहनही त्यांनी केले.





