प्रभात वृत्तसेवा पुणे – एखाद्या व्यक्तीला आपण जेवढी मोठी समजतो तेवढी ती मोठी नसते हे त्याच्या जवळ गेल्यावर अनुभवनातून लक्षात येते. त्याउलट ज्याला आपण छोटा समजत असतो, त्याला अनुभवल्यानंतर तो मोठा असल्याचे लक्षात येते. संघाचा असलो तरी मी संघर्षवृत्तीचा आहे. राजकारणात खरे आणि स्पष्ट बोललेले चालत नाही. मात्र, नेत्यांनी सकारात्मक राहून सत्य बोललेच पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार गडकरी यांना देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, विश्वस्त आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डाॅ. गीताली टिळक आणि डाॅ. प्रणिती टिळक तसेच अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, काही पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचे महत्त्व वाढते. काही पुरस्कार असे असतात ते ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीचे महत्त्व वाढते. लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला, खऱ्या अर्थाने माझे व्यक्तीत्त्व आणि मोठेपण यामुळे वाढले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद आणि संकोच दोन्ही आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य संकल्पनेतून राष्ट्रकारण सुरू केले. मात्र, सत्ताकारणाचे रुपांतर समाजकारण आणि राष्ट्रकारणात झाले पाहिजे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.माझ्या खात्याकडे खूप पैसे पडून आहेत, देशातही खूप पैसा आहे, तंत्रज्ञानही आहे. मात्र, इमानदारीने काम करणाऱ्यांची कमतरता आहे, अशी खंत व्यक्त करीत येत्या काळात प्रत्येक्ष क्षेत्रात अव्वल क्रमांकावर राहण्याची देशाची क्षमता आहे. त्यासाठी हिंमतीने लढत राहिलो तर कोणतीच गोष्ट कठीण नाही. मात्र, सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा विचार करावा लागेल. देश विश्वगुरू होण्याची क्षमता बाळगून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्राला जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आणण्याचे स्वप्न आहे, असे गडकरी यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडकरी हे नेते नाहीत तर संशोधक आहेत. प्रत्येक क्षेत्राची त्यांना माहिती आहे. नवीन प्रयोग त्यांना आवडतात. ते कधीही निराश होत नाहीत. पुणे-मुंबई दुतग्रती महामार्गाची कमी खर्चात आणि दोन वर्षात उभारणी करून त्यांनी देशाचा आत्मविश्वास उंचावला. या मार्गाच्या उभारणीनंतरच पायाभूत सुविधांमध्ये गुणात्मक बदल सुरू झाले. राजकारणात असूनही स्पष्ट आणि थेट बोलण्याची त्यांची पद्धत लोकांना आवडते. राजकीय सोयीचे ते बोलत नाहीत. त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची चिंताही ते करीत नाहीत. ते केवळ वैदर्भिय नव्हेत तर वैश्विक व्यक्तीमत्व आहेत. निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते… दूरदृष्टीने धडाकेबाज निर्णय घेऊन त्याला मूर्त स्वरूप देणारे गडकरी एक मोठे नेते आहेत. पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन ते समाजकारणात सक्रिय आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. तर, कमी बोलणे आणि जास्त काम करणे ही गडकरी यांची कार्यपद्धती आहे. मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हा लोकमान्यांचा बाणाही त्यांच्यामध्ये आहे. तर, पंतप्रधान मोदींच्या नवभारत संकल्पनेतील गडकरी हे एक प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या विकासनिमितीमुळे ते लोकमान्य झाले आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यासाठी ५० हजार कोटींची कामे.. पुणे शहर आणि परिसरासाठी येत्या डिसेंबरपर्यंत ५० हजार कोटींची विकासकामे केली जातील. त्यातील १५ हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन येत्या काही दिवसांत होईल. यानंतर आणखी १५ ते २० हजार कोटींची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई नवा हाय-वे केला जाईल. त्यामुळे मुंबईहून पुण्यात दीड तासांत तर पुण्याहून बेंगुलुरूला पाच तासांत पोहोचता येईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.