सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी व्यक्त केली भावना

मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या आमदारासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही एकांगी व अन्यायकारक असल्याची भावना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी व्यक्त केली. दानवेंनी सोमवारी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याशी शाब्दिक चमकक झाली होती. त्यात दानवेंनी लाड यांना आक्षेपार्ह शब्दांत शिवीगाळ केली. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी या प्रकरणी अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दानवे यांनी ही कारवाई एकांगी व अन्यायकारक असल्याचा आरोप केला.
सभापतींची कारवाई एकांगी व अन्यायकारक आहे. विरोधी पक्षनेत्याला एकतर्फी व मनमानी पद्धतीने निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना मिळालेल्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. पण कितीही वेळा निलंबन झाले तर जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही लढत राहणार, असे दानवे यांनी सांगितले. सभापतींनी विधिमंडळ सभागृहात ठराव किंवा चर्चा न घेता ठरवून पक्षपातीपणे निलंबनाची कारवाई केली. भाजपकडे असणाऱ्या पाशवी बहुमताच्या जोरावर ही कारवाई करण्यात आली. याद्वारे भाजपने एकप्रकारे लोकशाहीचा गळाच घोटण्याचे काम केले, असेही दानवे म्हणाले.
दिलगिरी व्यक्त करणार होतो, पण…
भाजपने यापूर्वी के्ंद्रात 150 खासदारांचे निलंबन करून आपण लोकशाही किती मानतो हे दाखवून दिले. सभागृहात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे, माझी भूमिका आहे. त्यानुसार आज मी सभागृहात कालच्या प्रकारावर दिलगिरीही व्यक्त करणार होतो. पण आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला माझी भूमिका मांडण्याची संधीच दिली नाही, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.





