Swanandi Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्ताने लेकीने केली भावुक पोस्ट; म्हणाली “तुमचा आत्मा मला…”

मुंबई : मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदाने लोकांना खळखळून हसायला भाग पाडले. गिरगावातील कुंभारवाड्यात जन्मलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जवळपास दोन दशकं मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने लक्ष्या मामांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
हमाल दे धमाल चित्रपटातील ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो…मी जिंकून घेतलं सारं’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे लक्ष्मीकांत बर्डेंचा जीवनप्रवास राहिला आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
काय लिहिले पोस्टमध्ये?
लक्ष्मीकांत बेर्डेचा एक जुना सुंदर फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “बाबा तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली, पण तुमच्या आठवणी अजूनही ज्वलंत वाटतात. तुमचा दयाळूपणा, विनोदीबुद्धी आणि अतूट प्रेमाने एका व्यक्तीला आणि मला आकार दिला.” तसेच ती पुढे लिहिते “इतक्या वर्षानंतरही तुमचे चाहते तुमच्या कामाची, विनोदाची प्रशंसा करत आहेत. तुम्ही सगळ्यांवर जबरदस्त छाप सोडली आहे आणि हा तुम्ही सोडलेल्या अविश्वसनीय वारशाचा एक पुरावा आहे. मी दिवसेंदिवस तुमच्यावर अधिक प्रेम करत आहे. तुमची मला खूप आठवण येत आहे. तुमची अनुपस्थिती ही आम्हाला नेहमी गमावलेल्या मौल्यवान वेळेची सतत आठवण करू देत असते. पण, तुमचा आत्मा मला आयुष्यातल्या आव्हानांमध्ये मार्गदर्शन करतो. बाबा, आपण पुन्हा भेटत राहू.”
‘लेक चालली सासरला’ चित्रपटाच्या माध्यमातून १९८४ साली लक्ष्मीकांत बेर्डेंनी मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’ अशा अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. कधी गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांना रडवलं. तर कधी विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जरी ते आज हयात नसले तरी पिढ्यान पिढ्या मराठी सिनेरसिकांच्या मनात कायम असणार आहेत.





