Laxman Hake : जे बीडमध्ये केले, तेच मुंबईत करायचे आहे; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेवर आरोप

बीड : बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळले. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत. जरांगे यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. याच दरम्यान गणेशोत्सवात मुंबईला जायचे आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आसून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंवर सडकून टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत जरांगे यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे यांना करायचा तो प्रयत्न रोखावा, अशी मागणी देखील हाके यांनी केली.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबलं पाहिजे. बेकायदेशीर मागणी करत असताना त्यांचे लाड का केले जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर जरांगे यांनी थोडासा अभ्यास करून हिंदी विषयाचे अवलोकन करावे, असा सल्ला देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला आहे. आता लक्ष्मण हाकेंच्या टीकेला मनोज जरांगे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.





