Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक ! मराठा आरक्षणासंदर्भातील GR फाडत सरकारवर टीका

पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयावर (जीआर) तीव्र नाराजी व्यक्त करत ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आंदोलनादरम्यान हा जीआर फाडला. मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती सुलभ केली आहे. या निर्णयाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध असून, हा जीआर ओबीसी आरक्षणावर घाला घालणारा आहे, असा आरोप हाके यांनी केला.
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांनी मौन आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. हाके म्हणाले, “जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा निर्णय घेतला आहे. आम्ही हा जीआर फाडून सरकारचा निषेध करतो.” पुढे, राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि तालुक्यांमध्ये ओबीसी समाज या निर्णयाविरोधात आंदोलन करेल, असे हाके यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटीत जीआरची होळी
अंतरवाली सराटी येथेही ओबीसी आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त केला. येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी ओबीसी बांधवांनी सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव मांडला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींचा आधार घेणारा हा शासन निर्णय मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून मागील दाराने आरक्षण देण्याचा डाव आहे, असा आरोप हाके यांनी केला.
हाके यांनी पुढे सांगितले की, जरांगे यांच्या मागण्यांमुळे सरकार दबावाखाली निर्णय घेत आहे, ज्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत आहे. या आंदोलनाद्वारे ओबीसी समाज आपला विरोध दृढपणे मांडत असून, यापुढेही हा लढा सुरू राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.





