मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या त्यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका करताना, त्यांच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते संविधान, न्यायालय आणि शासन-प्रशासनाला मानत नाहीत. झुंड जमवून ते हुकूमशहासारखे वागत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून ते समाजात दहशत निर्माण करत आहेत. त्यांचा इतिहास दंगलीचा आहे. त्यांना कायदा, लोकशाही आणि संविधानाची जाण नाही.” हाके यांनी सरकारला जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखायला हवे होते, असेही मत व्यक्त केले. जरांगे यांनी न्या. शिंदे समितीसोबत झालेल्या पहिल्या फेरीच्या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. यामुळे आंदोलक आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. हाके यांनी पुढे सवाल उपस्थित केला, “जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपेल, अशी भीती आहे. सरकारला खरंच ओबीसी आरक्षण संपवायचे आहे का? जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी आणि आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.” या घडामोडींमुळे मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.