Rajgurunagar : कायद्याचे राज्य संरक्षित करण्याची जबाबदारी वकिलांची
Rajgurunagar : संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले कायद्याचा सर्वंकष अभ्यास करताना न्यायालयीन निवाड्यांचाही (केस लॉ) अभ्यास करणे आवश्यक आहे. शिक्षण घेतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे

राजगुरुनगर : आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. ते संरक्षित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वकिलांची आहे. कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच आपली कर्तव्येही समजून घेतल्यास विधी क्षेत्रात मोठी भरारी घेता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य अॅड. गणेश शिरसाट यांनी केले.
येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-2027 च्या ‘दीक्षारंभ समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ या अंकाचे प्रकाशन अॅड. गणेश शिरसाट आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 10) करण्यात आले. या वेळी अॅड. शिरसाट बोलत होते.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक अरुण चांभारे, खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर, अॅड. संदीप घुले, अॅड. संदीप दरेकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे, डेहणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर भागवत, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश शहापूरे यांच्यासह विधी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. शिरसाट म्हणाले की, कायद्याच्या विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याइतकेच आपल्या कर्तव्यांचेही भान ठेवले पाहिजे. शॉर्टकटच्या मार्गाने जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. कायद्याच्या ज्ञानासोबतच इतर क्षेत्रांतील ज्ञानही आत्मसात करावे. करिअर करताना ध्येय निश्चित करून त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. एखाद्या विषयात देशपातळीवरील तज्ज्ञ व्हायचे असेल, तर दररोज एक तास त्या विषयाचे वाचन दहा वर्षे सातत्याने करावे किंवा त्या विषयाच्या अभ्यासासाठी दहा हजार तास द्यावेत. या दोन गोष्टी नव्या पिढीने लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले कायद्याचा सर्वंकष अभ्यास करताना न्यायालयीन निवाड्यांचाही (केस लॉ) अभ्यास करणे आवश्यक आहे. शिक्षण घेतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. गुगल, समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान क्षणिक असू शकते; पुस्तकांच्या वाचनाशिवाय सखोल ज्ञान मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गात आणि ग्रंथालयात बसून अभ्यास करावा.
वकिली व्यवसायात व्यावहारिक ज्ञानाला मोठे महत्त्व आहे. त्यासाठी व्यवहारज्ञान, पेहराव, निरीक्षणशक्ती आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व विकसित करणे आवश्यक आहे. चांगला वकील होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या बाबींचा अवलंब करावा, असे सांगून त्यांनी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्राजक्ता घोलप यांनी केले. सूत्रसंचालन अतुल कालेकर आणि प्रिया यालमाटे यांनी केले, तर प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी आभार मानले.
शॉर्टकट आणि ‘ईझी मनी’च्या मोहापासून दूर राहा
नवीन वकिलांबाबत बार कौन्सिलकडे अनेक तक्रारी येत आहेत. शॉर्टकट आणि सहज पैसा मिळविण्याच्या मोहापायी काही जण व्यावसायिक मूल्यांपासून दूर जात चुकीचे मार्ग स्वीकारत आहेत. काही ठिकाणी वकिलांवर गुन्हेही दाखल होत आहेत. त्यामुळे नवोदित वकिलांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे. वकिली हे अत्यंत सुंदर करिअर असून त्यासाठी ज्ञान संपादन करण्यावर भर द्यावा. समाजमाध्यमांपासून काही अंतर राखून पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहन अॅड. गणेश शिरसाट यांनी केले.





