वकिल गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई – वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. नोकरभरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा पुरावा एसटी कामगार संघटनेने सादर केला. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सदावर्तेंवर गंभीर आरोप केले आहेत.
बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. तर जयश्री पाटील यांच्या खात्यावरती संचालक मगरे, सितापराव, उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केल्याचा एसटी कामगार संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, एसटी बँक भरती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केला.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कामगारांच्या सहकारी बँकमधील प्रकरणाचा बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. याआधीही संदीप शिंदे यांनी सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मागील वर्षी मार्च २०२४ मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अवहालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं. अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं, पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही. तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलवून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीनंतर सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्याने घेतला होता. याबद्दलही संदीप शिंदे यांनी याप्रकरणी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.




