Satara | मुकादमांनी ऊस वाहतूकदारास घातला १२ लाख रुपयांना गंडा

कोरेगाव (प्रतिनिधी) – ऊस तोडणीसाठी मजूर देण्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मुकादमांनी चिमणगाव येथील शेतकरी व ऊस वाहतूकदारास तब्बल १२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिमणगाव येथे उदय बळवंत जाधव यांचा शेती व ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे. ते गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर मिलला ऊस तोडणी करून वाहतुकीद्वारे पुरवठा करत आहेत.
दि. १२ जुलै २०२२ व दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी जाधव यांनी कोरेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिलीप वना महाजन व दिलीप शिवाजी गोपाळ, (दोघे रा. जाधव वडगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याबरोबर करारनामे केले.
या कराराद्वारे एकूण २० कोयते म्हणजेच ४० ऊस तोडणी मजूर पुरविण्याचा विश्वास दोघांनी दर्शविला व त्याप्रमाणे करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करत बारा लाख रुपये त्यांनी जाधव यांच्याकडून घेतले.
तदनंतर दोन वर्षांमध्ये त्यांनी जाधव यांना ऊस तोडणी मजूर पुरविले नाहीत व घेतलेली बारा लाख रुपयांची रक्कम परत दिलेली नाही. .
त्यांनी फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर उदय जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत.





