ओटावा, (कॅनडा) : लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगला कॅनडाने दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. हतया, खंडणी, शस्त्रेआणि अमली पदार्थांची भारतात आणि परदेशात तस्करी केल्याबद्दल बिश्नोई गँगला दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात आले आहे. बिश्नोई गँगला दहशतवादी गट म्हणून घोषित केल्यामुळे या गटाशी संबंधित मालमत्ता, रोख रक्कम, वाहने आणि अन्य मालमत्ता गोठवली जाईल. त्यामुळे कॅनडातील तपास संस्थांना या गटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिक बळ प्राप्त होईल. बिश्नोई गँगविरोधात सध्या अनेक प्रकरणांविषयी तपास केला जातो आहे. यामध्ये दहशतवादी कारवायांना अर्थसहाय्य केल्याची प्रकरणेही आहेत. या संदर्भात देखील कॅनडामध्ये तपास केला जातो आहे. बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींविरोधात कॅनडातील कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी, यासाठी या गँगला दहशतवादी कृत्यांशी संबंधित गट म्हणून घोषित केले जाणे आवश्यक होते. त्यानुसार कॅनडा सरकारने ही घोषणा केली आहे. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली. कॅनडामध्ये हिंसाचार आणि दहशतीच्या कारवायांना कोणतेही स्थान असणार नाही. विशेषतः विशिष्ट समुदायामध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना कॅनडामध्ये काहीही स्थान असणार नाही. म्हणूनच गुन्हेगारी कायद्याखाली बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी घेतला आहे, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.