लॉरेन्स बिश्नोईने व्हिडिओ कॉलवर पाकिस्तानी गुंडाला दिल्या ‘ईदच्या शुभेच्छा..!’ वादानंतर तुरुंग प्रशासनाने मांडली भूमिका

Lawrence Bishnoi । पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागील सूत्रधार कुख्यात गँगस्टर लॉरेन्सचा १७ सेकंदांचा व्हिडिओ कॉल व्हायरल झाला आहे. यामध्ये तो पाकिस्तानचा कुख्यात डॉन शहजाद भाटीशी बोलताना दिसत आहे. लॉरेन्स भट्टीला ईदच्या शुभेच्छा देत आहे. असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर शेअर करून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की,’लॉरेन्सने पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची हत्या केली आणि आता बिश्वोईनेही पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भाटीला ईदच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर हे सर्व गुजरात तुरुंगातून केल्याचेही त्यांनी सांगितले. तुरुंगात असूनही तो किती मोकळा आहे, हे यावरून दिसून येते.’ असे बिक्रम सिंह मजिठिया यांनी लिहिले आहे.
Lawrence Bishnoi । पोलिसांनी खुलासा केला
लॉरेन्स आणि पाकिस्तानी गुंड यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साबरमती जेल आणि गुजरात पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी सुरुवातीला काहीही सांगितले नाही. त्यानंतर साबरमती कारागृहाच्या डीएसपींनी हा व्हिडिओ साबरमती कारागृहातील नसल्याचे सांगितले. हा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवला गेला असावा. ईद वर्षातून एकदा येत नाही, त्यामुळे हा कोणत्या ईदचा व्हिडिओ आहे हे सांगणे कठीण आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
Lawrence Bishnoi । या प्रकरणावरून राजकारण तापले
गुजरात तुरुंगातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. आम आदमी पक्षाने भाजप पक्ष आणि भाजपचे पंजाब अध्यक्ष सुनील जाखड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आम आदमी पार्टीचे पंजाबचे ज्येष्ठ नेते नील गर्ग यांनी या मुद्द्यावर सुनील जाखड यांना धारेवर धरले आणि प्रत्येक मुद्द्यावर पंजाबची बदनामी करणारे जाखड याप्रकरणी आपल्या पक्षाच्या गुजरात सरकारला प्रश्न करणार का? असा प्रश्न विचारला आहे.





