Lawrence Bishnoi Gang – पिंपरीतील व्यावसायिक व सोशल मीडियावर गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नाना वाघचौरे यांना लॉरेन्स बिशोई गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात दिली. या प्रकरणी वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे लेखी तक्रार देत तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.सनी नाना वाघचौरे (रा. नेहरूनगर, पिंपरी) हे हिंदी सिनेसृष्टीत चित्रपट फायनान्सिंगचे काम करतात. कपिल शर्मा शो, बिग बॉस १६, ‘खतरा खतरा’ यांसारख्या कार्यक्रमांत सहभाग, तसेच सामाजिक-व्यावसायिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात सोने परिधान केल्याने ते ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जातात. ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या कार्यक्रमाला अजित पवार यांची उपस्थिती होती, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप मिसकॉल आले. त्यानंतर ‘बिशोई गँग’मधून बोलत असल्याचा दावा करत धमकी देण्यात आली. २६ जानेवारी रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश पाठवून “५ कोटी दे; नाहीतर गोळी कुठूनही येऊ शकते; उत्तर दिले नाही तर तुझाही बाबा सिद्दीकी करू,” अशी थेट धमकी देण्यात आली. पाच दिवसांची मुदत देत जीवितास धोका असल्याचा इशाराही संदेशात होता. या संदेशांमुळे आपण घाबरून गेलो असून, जीविताला धोका आहे, असे सांगत वाघचौरे यांनी कायदेशीर सल्ल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि सुरक्षा पुरवावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. सदरचे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे तपासाकरिता देण्यात आले आहे.