Latur Municipal Election Results 2026: लातूर महानगरपालिका निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने या ठिकाणी ७० पैकी ४७ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता राखली आहे. भाजपला २२ जागा राखण्यात यश आले आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाचा फटका भाजपला बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथील प्रचारसभेत बोलताना माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या संदर्भात मोठे विधान केले होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, लातूरमध्ये सध्या भाजपचा जो काही झंझावात दिसत आहे, तो पाहता येणाऱ्या काळात लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले. विलासराव देशमुख हे केवळ लातूरचेच नव्हे तर राज्याचे लोकप्रिय नेते असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत चव्हाणांचा जोरदार निषेध केला. लातूरमध्ये चव्हाणांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही या वक्तव्याचा कडक शब्दांत समाचार घेतला. वाढता दबाव आणि टीकेची झोड पाहता, अखेर रवींद्र चव्हाण यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.