Latur accident – औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत पद्माकर शिंदे यांचा मुलगा प्रसाद आणि मुलगी गायत्री या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बोलेरो गाडी आणि ट्रकच्या दरम्यान आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहनांचे चालक वाहनांसह घटनास्थळावरून पळून गेले आहेत. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी भाऊ प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, लातूरकडे जाणाऱ्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने बोलेरोने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले, आणि त्याच वेळी ट्रकने त्यांना चिरडले. औसा शहरातील पोतदार शाळेसमोर ही दुर्घटना घडली आहे.अपघाताची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.