Zilla Parishad Election : राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांनतर राज्यातील ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्या सोडून 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. खरंतर सर्वेाच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ या पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, दिलेली मर्यादा ओलांडून त्यानंतर काही दिवसांत झेडपीच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणी एक याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याने झेडपी निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे. दाखल केलेल्या याचिकेबाबत आज सोमवारी सुनावणी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी येथील जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर्स असोसिएशनचे पदाधिकारी कैलास जगन्नाथ गोरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांनाही ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करून निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची तयारी पूर्ण केली होती. या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्याच्या तयारीत राज्य निवडणूक आयोग होते. या सगळ्यात याचिका दाखल करण्यात आल्याने आजच्या सुनावणीत कोर्ट निवडणुकीबाबत काय भूमिका घेणार? कोणता निर्णय घेणार? यावर निवडणुका नेमक्या कधी होणार? हे स्पष्ट होणार आहे. मात्र, याचिकेमुळे पुन्हा एकदा झेडपीच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. हेही वाचा : लाडक्या बहिणींच्या डिसेंबर-जानेवारीच्या हप्त्याला लागणार ब्रेक? महत्त्वाची अपडेट समोर