Sanjay Raut : महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना मोठा राडा झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेमुळे राजकारण चांगलेच तापले होते. उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. या प्रकरणात कोर्टाने विकास गोगावले यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून पोलीस यंत्रणेसह हाती असणाऱ्या सत्तेचाबही गैरवापर सुरु आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ज्या पद्धतीचे राज्य या महाराष्ट्रात भाजप चालवतंय ते पाहिलं आहे का, गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधले एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही असेही राऊत म्हणाले. त्यांचा (विकास गोगावले) अटकपूर्व जामीनही हायकोर्टाने फेटाळला म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. नेमकं प्रकरण काय? महाड नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात शिंदेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर माणगाव कोर्टाने दोन वेळा आणि मुंबई कोर्टाने एकदा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हेही वाचा : भरत गोगावलेंच्या मुलाच्या अडचणी वाढल्या! ‘त्या’ प्रकरणातील जामीन अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय