Year Ender 2025 Top 5 Cricket records : वर्ष २०२५ आता हळूहळू समाप्तीकडे झुकत आहे. क्रिकेटच्या मैदानावर या वर्षाने चाहत्यांना असे काही क्षण दिले, जे इतिहासाच्या पानात कायमचे कोरले गेले आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधी घडले नाही, ते यावर्षी घडले, तर आयपीएलमध्ये अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने जगाला थक्क केले. या वर्षातील अशाच ५ मोठ्या विक्रमांचा हा विशेष आढावा घेऊया. १. कसोटी इतिहासातील ‘न भूतो न भविष्यती’ घटना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात आणि सुमारे २५६१ सामन्यांमध्ये जे कधी घडले नव्हते, ते या सामन्यात पाहायला मिळाले. दोन्ही संघांचे सलामीवीरउस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) आणि एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका)पहिल्या डावात शून्यावर बाद झाले. दोन्ही बाजूंचे सलामीवीर खातेही उघडू न शकण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. २. आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीर आयपीएल २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने वयाची अट मोडीत काढत नवा इतिहास रचला. राजस्थानकडून खेळताना वैभवने अवघ्या १४ वर्षे ३१ दिवस या वयात गुजरातविरुद्ध वादळी शतक ठोकले. शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत त्याने आपली मनस्थिती दर्शवली आणि केवळ ३५ चेंडूंत ७ चौकार व ११ षटकारांच्या मदतीने शतकी मजल मारली. हेही वाचा – Temba Bavuma : बुमराहच्या ‘बुटक्या’ कमेंटवर बावुमाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘माफी मागितली, पण विसरलो नाही!’ ३. आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव १५ एप्रिल रोजी चंदीगडमध्ये क्रिकेटचा चमत्कार पाहायला मिळाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केवळ १११ धावा केल्या होत्या. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ९५ धावांतच गारद झाला. आयपीएलच्या १७ वर्षांच्या इतिहासात इतक्या कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्याची ही पहिलीच वेळ होती. ४. पाकिस्तानचा टी-२० मध्ये विजयरथ सुसाट पाकिस्तान संघाने २०२५ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले. सलमान आगाच्या नेतृत्वाखाली संघाने एका वर्षात तब्बल २१ विजय मिळवण्याचा नवा जागतिक विक्रम केला. त्यांनी एकूण ३४ सामने खेळले, ज्यात श्रीलंका आणि बांगलादेशचा क्लीन स्वीप देखील समाविष्ट आहे. हेही वाचा – Vijay Hazare Trophy : ३२ चेंडूत शतक! सकीबुल गनीने मोडले सर्व विक्रम; इशान-वैभवलाही टाकले मागे ५. अभिषेक शर्माचे वानखेडेवर ‘तूफान’ भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने २ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्याने ५४ चेंडूंत १३५ धावांची खेळी केली. यात त्याने १७ चेंडूंत अर्धशतक आणि ३७ चेंडूंत शतक पूर्ण केले, जे भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. २५० च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.