मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी पुढे आली आहे. ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. चिंचणी मायाक्का देवी यात्रेचा मुद्दा उपस्थित प्रकाश शेंडगे यांनी आपल्या पत्रात धनगर व बहुजन समाजाची कुलस्वामिनी चिंचणी मायाक्का देवी यात्रा लक्षात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी नमूद केलं आहे की, 5 फेब्रुवारी 2026 रोजीच या यात्रेचा प्रमुख दिवस असून ही वार्षिक पवित्र यात्रा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणावर भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील लाखो धनगर व बहुजन समाजातील भाविक कुटुंबासह कर्नाटकात जातात. यात्रा पूर्ण झाल्यानंतर बहुतांश भाविक 7 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या गावी परततात. मतदानावर परिणाम होण्याची शक्यता या कालावधीतच मतदान झाल्यास मोठ्या संख्येने मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेतील सहभागावर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या घटण्याची भीती शेंडगे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी लोकशाही प्रक्रियेत सर्व समाजघटकांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम किमान दोन दिवस पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीवर आयोग काय निर्णय घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.