मुंबई : महापालिका निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. येथे भाजपला एकहाती बहुमत नसल्याने महापौरपदासाठी शिंदे गटाची साथ अपरिहार्य ठरणार आहे. याच धर्तीवर राज्यातील आणखी एका महापालिकेतही सत्ता-समीकरण रंगतदार बनले आहे. उल्हासनगर महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी 37 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 39 जागांचा आकडा आवश्यक असल्याने सध्या दोन्ही बाजू बहुमतापासून दोन जागा दूर आहेत. या परिस्थितीत उल्हासनगर महापालिकेत महापौर कोणाचा होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी आमचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, या सत्तासंघर्षात वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेत आता शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होण्याची शक्यता अधिक आहे. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नगरसेवक सध्या अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांना बहुमतासाठी केवळ दोन नगरसेवकांची गरज असल्याने उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.