मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख काहीसा खालावल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली असली, तरी पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांपासून ते अलिप्त राहात असल्याचे जाणवत आहे. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला असून, त्यामागे तीन महत्त्वाच्या घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. अमित शहांशी भेट काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसल्याचे सांगत पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार कार्यरत असताना थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने मुंडेंच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले. अजित पवारांच्या कार्यक्रमांपासून दूर धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बीड जिल्ह्यात ते पक्षाचे प्रमुख नेते मानले जात होते. मात्र अलीकडच्या काळात अजित पवार यांच्या अनेक जाहीर सभा आणि दौऱ्यांमध्ये मुंडे अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या बीड दौऱ्यात अजित पवारांसोबत विविध पक्षांचे नेते उपस्थित असताना, कौटुंबिक कारण देत धनंजय मुंडे मात्र या दौऱ्यापासून दूर राहिले. यामुळे त्यांच्यात आणि अजित पवारांमध्ये अंतर वाढल्याच्या चर्चांना चालना मिळाली आहे. फडणवीसांसोबत जवळीक संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथगड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी फडणवीसांनी ‘माझे मित्र’ असा उल्लेख करत मुंडेंचे नाव घेतल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले. त्यानंतर दोघांनी एकत्र हेलिकॉप्टर प्रवास केल्याचेही समोर आले. पक्षांतर लगेच शक्य नाही मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्या, तरी हा निर्णय लगेच होणे सोपे नाही. कारण ते सध्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत. कार्यकाळ संपण्यापूर्वी पक्षांतर करायचे असल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे पोटनिवडणुकीचा धोका ते पत्करतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. मात्र वाढत्या चर्चांमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.