मुंबई : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या मंत्रीपदासह आमदारकीवरही टांगती तलवार आहे. मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. आज या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला. दरम्यान, कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून, उद्या (१८ डिसेंबर) तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आता पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकीकडे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर माणिकराव कोकाटे यांच्या संकटानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा दौरा पूर्वनियोजित होता की मंत्रीपदाच्या ‘घरवापसी’साठी योग्य मुहूर्त पाहून हालचाली सुरू झाल्या, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे यांनी दिल्लीत संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. एनडीएतील बहुतेक वरिष्ठ नेते सध्या दिल्लीत असल्याने मुंडे मंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोकाटे यांच्या मंत्रिपदावर संकट निर्माण झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे.