रांची – झारखंडमध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये जंगली हत्तींच्या हल्ल्यात दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. यात रामगढ जिल्ह्यात मांडू ब्लॉकमधील वनक्षेत्रात चार, तर रांचीच्या अंगारा येथील जिदू गावातील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शनिचरवा मुंडा (३६), अमूल महतो (३५), कनिया देवी (८५), सावित्री देवी (६५) आणि अमित कुमार राजवार (३२) अशी मृतांची नावे आहेत. रामगढचे विभागीय वन अधिकारी नितीश कुमार म्हणाले, रामगढ आणि बोकारो जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलांमध्ये सुमारे ४२ जंगली हत्ती फिरत आहेत. या भागातील जंगली हत्तींच्या कळपावर दोन जलद प्रतिसाद पथके आणि वनरक्षक लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हत्तींच्या हल्ल्यात झालेली नुकसान भरपाई आणि हे हल्ले रोखण्यासाठी पुरेशा सुरक्षा उपायांची मागणी करत येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.