Ravi Jadhav Interview : मराठी सिनेविश्वातील दिग्दर्शकांच्या यादीतील मोठं नाव म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव. नटरंग चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर खऱ्या अर्थाने दिग्दर्शक रवी जाधव यांना ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी बालक-पालक, टाईमपास, टाईमपास २ यासंह काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. रवी जाधव यांनी अभिनेता रितेश देशमुख याला घेऊन हिंदीत बँन्जो नावाचा चित्रपट केला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. रवी जाधव यांच्या एका चित्रपटाची मोठी चर्चा झाली पण चित्रपट नेमका कशामुळे रखडला याचे कारण समोर आले नव्हते. अखेर याबाबत स्वतः रवी जाधव यांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये रवी जाधव यांनी बाल शिवाजी चित्रपटाबाबत महत्वाची माहिती दिली. बाल शिवाजी या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक आणि एक टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. पण दरम्यानच्या काळात कोणतीही अपडेट चित्रपटाची प्रेक्षकांसमोर आली नाही. यावर रवी जाधव यांनी कॅचअप यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले आहे. काय म्हणाले रवी जाधव? राजा शिवाजीसारखं बजेट मराठीत खूप कमी स्टुडिओ देऊ शकतात त्यामुळे माझ्याकडे इतक मोठं बजेट असणार नाही. मग छोट्या बजेटमध्ये मी काय करू शकतो? असे रवी जाधव म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मला सिनेमामध्ये आई आणि मुलाची गोष्ट सांगायची होती. त्या सिनेमात युद्धाचे सीन जास्त नसतील तर माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, ते कसे घडले हे दाखवायचं होतं. म्हणूनच मी बाल शिवाजीची घोषणा केली. दोन ऐवजी चार पैसे खर्च करा पण सिनेमात असंच करूया… असं म्हणणारा निर्माता मी शोधत असल्याची माहिती रवी जाधव यांनी दिली. या चित्रपटावर बोलताना रवी जाधव पुढे म्हणाले, दिवसेंदिवस मला त्याबद्दल बरंच नाव काहीतरी सुचत असतं. जसजसे इतिहासातले नवीन संदर्भ येतात तसतसं मला आणखी मजा येते. 2015 पासून छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचं माझं स्वप्न होतं ते मी नक्की पूर्ण करणार, असा विश्वास रवी जाधव यांनी व्यक्त केला. यावरून असे लक्षात येते की, रवी जाधव यांना देखील निर्मात्याची चणचण भासत आहे. त्यामुळे आता बाल शिवाजी चित्रपटावर कधी काम सुरू होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Parineeti Chopra: ‘सकाळी उठताच मोबाईलपासून दूर राहा’; आई झाल्यानंतर आरोग्य कसं जपलं, याबद्दल परिणीती चोप्राने दिल्या हेल्थ टिप्स