Tejashwi Ghosalkar : राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर मुंबईत एक मोठी घडामोड घडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडण्याचे कारण काय असू शकते? याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला, त्यावेळी महापालिकांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यावेळी आरक्षण सोडतनंतर माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत आली होती. त्यांच्या वार्डमध्ये ओबीसी आरक्षण लागल्याने त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्या वॉर्ड क्रमांक १ मधील जागा ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे, मी ही निवडणूक लढवू शकणार नाही, अशी घोषणा पोस्टमधून त्यांनी केली होती. हा निर्णय खरोखरच निराशाजनक आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही म्हणून नाही, तर मी माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील लोकांची प्रतिनिधी म्हणून सेवा करणे सुरू ठेवू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटते, अशी खंत त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली होती. पण अचानक त्यांनी ठाकरेंची मशाल सोडून आपल्या हाती कमळ घेतले आहे. हा ठाकरेंसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. ‘या’ गोष्टीची सुरू झालीय चर्चा मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांना शेजारच्याच वार्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकांचे बिगुल वाजले असून इच्छुकांची भाऊगर्दीही भाजपात वाढू लागले आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर खूप गोष्टी आहेत, पण बोलू शकतं नाही, विकासाच्या कामांसाठी भाजपात गेल्याचे सूचक विधान केले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आमच्याकडेही बोलण्यासारखे खूप काही आहे, पण आता बोलणार नसल्याची प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्ष प्रवेशावर दिली होती. हेही वाचा : पंजाबमधील ‘या’ तीन शहरात मद्य आणि मांस विक्रीवर बंदी ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय