Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’साठी संयुक्त मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक, मराठी माणसासाचे अस्तित्व, मुंबईकरांना भेडसवणारे प्रश्न आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही मुलाखत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. खरंतर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीने सर्वांनाचा आश्चर्याचा सुखद धक्का दिला. शिवसेनेपासून फारकत घेऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या त्यांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दुरावले गेले. नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अभूतपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील अनेकांना दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी इच्छा होती. अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती केली आहे. पण २० वर्षे का वाट पाहावी लागली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. मुलाखतीच्या प्रारंभी दोन्ही नेत्यांची ओळख करून दिल्यानंतर संजय राऊत यांनी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली? असा प्रश्न विचारला यावर राज ठाकरे यांनी दिलेले उत्तर लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. राज ठाकरे काय म्हणाले? “काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे.” असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले आहे. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, “आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार.” उद्धव ठाकरे म्हणाले… राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य करत, “आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे पोळी भाजून जातील.” हेही वाचा : PMC Election: भाजप-आरपीआय उमेदवारांची प्रभाग १६ मध्ये पदयात्रा; कमळ चिन्हाला मतदानाचे आवाहन