मुंबई – महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्याच दिवशी दावोस दौऱ्यावर गेले असून, महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र, या दावोस दौऱ्याची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असून, हा केवळ भाजपा महायुती सरकारचा दिखावा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची गरजच काय आहे? या कंपन्यांशी मुंबईतच करार करता आले नसते का? असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी व गुंतवणुकीच्या नावाखाली जनतेच्या नजरेत धुळफेक असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जाणे ही भाजपा महायुती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची इव्हेंटबाजी आहे. यावर्षीही ही इव्हेंटबाजी सुरुच असून ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले त्यातील काही कंपन्या मुंबईतील आहेत. या परिषदेत पहिल्याच दिवशी 14.50 लाख कोटींचे करार व 15 लाख रोजगार निर्मितीचे विविध कंपन्यांशी करार केल्याचा दावा करण्यात आला. ज्या कंपन्यांशी गुंतवणुकीचे करार करण्यात आले त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची लोढा डेव्हलपर्सशी 1 लाख कोटी रुपये, के. रहेजा यांच्याशी 80 हजार कोटी व अल्टा कॅपिटल-पंचशील या कंपनीशी 2 लाख कोटी रुपये किमतीचे करार करण्यात आले आहेत. या तिन्ही कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत, तर काही मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर आहेत. या कंपन्या महाराष्ट्रातील असताना दावोसला जाऊन करार करण्याची गरज का भासावी. राज्यात गुंतवणूक आली पाहिजे ही सर्वांची अपेक्षा आहे, त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही. पण सरकार करत असलेले दावे व वस्तुस्थिती याची माहिती जनतेला झाली पाहिजे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.