नाशिक : सदनिका प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अडचणी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली होती. पण कृषी खाते काढून त्यांच्यावर क्रीडा खात्याच्या जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र ३० वर्ष जुन्या प्रकरणात कोकाटे अडकले असून त्यांना सुनावणीत आलेली २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे सध्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडा आणि अल्पसंख्यांक खाते आपल्याकडे ठेवले आहे. पण हे खाते आता कुणाकडे जाणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. क्रीडाखाते कुणाला मिळणार? क्रीडाखाते अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले असले तरी ते खाते ते माजी मंत्र्यांना देणार की नव्या चेहऱ्याला मंत्रीमंडळात संधी देणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तूर्तास या खात्यासाठी काही माजी मंत्र्यांची नावं समोर आली आहेत. यामध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांना हे खाते मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके यांना संधी मिळू शकते. हे खाते देताना अजित पवार जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतरच हे खाते संबंधित माजी मंत्री किंवा मग नव्या चेहरा समोर आणून दिले जाऊ शकते. प्रकृतीबाबत डॅाक्टर काय म्हणाले? बनावट कागदपत्रांच्या आधारे ११९५-९६ मध्ये सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाभचा कोणताही अधिकार नसताना अशा प्रकारे सरकारची दिशाभूल करून संबंधित सदनिका आपले नावे केल्याप्रकरणी ते दोषी आढळले असून त्यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आली. त्यांनी या निर्णयाला आव्हान दिले असून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज १९ डिसेंबर शुक्रवारी पार पडणार आहे. सध्या कोकाटे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती संदर्भात डॅाक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोकाटे यांना उच्चरक्त दाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डॅाक्टरांनी पोलिसांना दिली आहे. पुढील काही दिवस देखरेखेखाली ठेवणे गरजेचे असल्याचे मत डाॅक्टरांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा : Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटवर आयकर विभागाचा छापा