मुंबई : बीएमसी निवडणुकीच्या निकालांनी मुंबईचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या प्रचंड यशानंतर आता सगळ्यांचे लक्ष मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार, याकडे लागले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईचा पुढचा महापौर हिंदू आणि मराठी असेल” असे ठाम विधान केले होते. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर हे विधान आता केवळ राजकीय घोषणा न राहता पक्षासाठी एक मोठे आव्हान आणि संधी बनले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये महापौरपदासाठी काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 1) तेजस्वी घोसाळकर दहिसर (प्रभाग क्रमांक २) मधून १० हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या तेजस्वी घोसाळकर या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. त्या शिवसेनेचे दिवंगत नेते विनोद घोसाळकर यांच्या सून असून, २०२३ मध्ये पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्या चर्चेत आल्या होत्या. अलीकडेच त्यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला. तरुण, सुशिक्षित आणि “मराठी-हिंदू” या सूत्रात बसणारे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. 2) प्रकाश दरेकर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. दरेकर कुटुंबाचा वायव्य मुंबईत मराठी मतदारांवर प्रभाव असून, प्रशासकीय अनुभवामुळे ते महापौरपदासाठी मजबूत दावेदार मानले जात आहेत. 3) प्रभाकर शिंदे भाजपचे बीएमसीतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे अत्यंत अनुभवी नगरसेवक आहेत. महापालिकेचे नियम, कामकाज आणि प्रशासनाची सखोल माहिती असलेला “मराठी चेहरा” म्हणून त्यांच्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जात आहे. 4) मकरंद नार्वेकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे दक्षिण मुंबईतील प्रभावी नेते आहेत. कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड असून सातत्याने निवडून येण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आधुनिक आणि पुरोगामी प्रतिमा हा त्यांचा मोठा प्लस पॉइंट मानला जात आहे. 5) राजश्री शिरवाडकर प्रभाग क्रमांक १७२ मधून विजयी झालेल्या राजश्री शिरवाडकर या भाजपच्या आक्रमक आणि निष्ठावंत मराठी महिला नेत्या आहेत. जर आरक्षणानुसार महिला महापौर करण्याचा निर्णय झाला, तर त्यांचे नाव आघाडीवर असण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्नांवर त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. भाजपचा ऐतिहासिक विजय आणि मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत पाहता, मुंबईच्या महापौरपदाची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. आता पक्ष नेतृत्व कोणावर विश्वास दाखवते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.