ढाका : बांग्लादेशातील मैमनसिंह जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात १८ डिसेंबर २०२५ रोजी हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली आणि मृतदेह झाडाला बांधून जाळला. ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली घडलेल्या या अमानुष घटनेने बांग्लादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसेची नवी लाट उसळली आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. दीपू चंद्र दास कोण होता? दीपू चंद्र दास हा मैमनसिंह शहरातील स्क्वेअर मास्टरबारी परिसरातील ‘पायनियर निट कम्पोझिट’ या गारमेंट फॅक्टरीत मजूर म्हणून काम करत होता. तो गरीब हिंदू कुटुंबातील असून, अपंग वडील, आई, पत्नी आणि लहान मुलाचा उदरनिर्वाह करणारा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. दीपू भाड्याच्या घरात राहत होता आणि अत्यंत साधं जीवन जगत होता. नेमकं काय घडलं? फॅक्टरीत वर्ल्ड अरेबिक लँग्वेज डे साजरा करताना एका सहकाऱ्याशी झालेल्या क्षुल्लक वादातून दीपूवर पैगंबर मुहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा खोटा आरोप लावण्यात आला. हा आरोप फॅक्टरी आणि परिसरात झपाट्याने पसरला. गुरुवारी रात्री जमावाने दीपूला फॅक्टरीबाहेर पकडले, बेदम मारहाण केली आणि जागीच ठार मारले. नंतर मृतदेह ढाका-मैमनसिंह महामार्गावर नेऊन झाडाला बांधला आणि रॉकेल ओतून जाळला. यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. दीपूचे वडील रविलाल दास यांनी सांगितले, मुलाला आधी मारहाण केली, झाडाला बांधले आणि जाळले. अर्धजळालेला मृतदेह रस्त्यावर टाकला. हे दृश्य असह्य आहे. या घटनेची माहिती कुटुंबाला सोशल मीडियावरून मिळाली. निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आरोप खोटा असल्याचे सांगितले. पोलिसांच्या संरक्षणात असतानाही दीपूला जमावाकडून सोडवले नाही, असा दावा त्यांनी केला. आतापर्यंत काय कारवाई झाली – रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB-१४) ने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ७ मुख्य संशयितांना अटक केली आहे. मोहम्मद लिमोन सरकार (१९), मोहम्मद तारेक हुसैन, मोहम्मद मानिक मिया, इरशाद अली, निजुम उद्दीन, आलमगीर हुसैन आणि मिराज हुसैन अंकन (४६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. – अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी घटनेचा निषेध करत “नव्या बांग्लादेशमध्ये हिंसेला जागा नाही, दोषींना सोडले जाणार नाही” असे सांगितले. – मृतदेह मैमनसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.