Navneet Rana | Asaduddin Owaisi – हिंदूंनीही कुटुंब नियोजनाचा विचार न करता तीन-चार मुले जन्माला घालायला हवीत असे भाजप नेत्या नवनीत राणा सांगतात. हे खरे आहे. त्यासाठी तुम्हाला कुणी रोखले आहे? मी स्वत: सहा मुलांचा बाप आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. महाराष्ट्रात दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना पंचायत निवडणूक लढवण्याची परवानगी नाही, परंतु तेलंगणामध्ये हा नियम बदलण्यात आला आहे. त्यामुळे कुणाला किती मुले असावीत या मुद्यावर संघर्ष उसळला आहे. ओवैसी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडू तीनपेक्षा जास्त मुले असण्याबद्दल बोलतात. त्यांना कुणी रोखत नाही. मग आम्ही तरी काही चूक केली आहे का? भारतातील एकूण प्रजनन दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. मुस्लिमांमध्ये सर्वाधिक जन्मदरात घट झाली आहे. ती हिंदूंच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही, परंतु लवकरच तेही होईल. पूर्वी असे म्हटले जात होते की, मुस्लिमांना इतकी मुले होत आहेत की, ते हिंदू लोकसंख्येला मागे टाकतील. परंतु नव्या चित्रानुसार तसे होणार नाही. ओवैसी यांनी तज्ञांचा हवाला देत म्हटले की, २०६९-२०७० पर्यंत हिंदू लोकसंख्या स्थिर होईल आणि मुस्लिम लोकसंख्या देखील स्थिर होईल. पुढील ३०-४० वर्षांत सुमारे ५० टक्के लोकसंख्या वृद्ध असेल. त्यांनी यासाठी आपण कशी तयारी करत आहोत? पुढील २०-२२ वर्षांसाठी भारताकडे लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा घेण्याची संधी आहे आणि महासत्ता बनण्याची चांगली संधी आहे, परंतु आपण त्याचा योग्य वापर करू शकत नाही. नवनीत राणा काय म्हणाल्या? भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अलिकडेच हिंदूंना किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. एका मुस्लिम कुटुंबात एका ३० वर्षीय्य व्यक्तीला १९ मुले आणि चार बायका आहेत. त्यांना मोठ्या संख्येने मुले जन्माला घालून भारताला पाकिस्तान बनवायचे आहे. मग आपण फक्त एकाच मुलावर समाधानी का राहावे? असं त्या म्हणाल्या होत्या.