मुंब्रा : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून तरुण नेत्या सहर शेख या निवडून आल्या आहेत. या विजयामुळे मुंब्रा परिसरात राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी असलेला जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सहर शेख हिचे वडील युनूस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी मुंब्रा येथे प्रचारादरम्यान युनूस शेख यांनी आव्हाड यांना जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यंदाच्या महापालिका निवडणुकीत युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख एमआयएमकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आणि त्यांनी थेट विजय मिळवला. विजयानंतर झालेल्या जाहीर सभेत युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत आक्रमक भाषेत इशारा दिला. “माझ्या मुलीला उमेदवारी नाकारली, पण आज ती एमआयएमकडून निवडून आली आहे. तिच्या भविष्यात कुणी अडथळा आणू नये,” असे म्हणत त्यांनी आव्हाड यांना लक्ष्य केले. दरम्यान, सहर शेख यांनी आपल्या भाषणातही आक्रमक भूमिका मांडली. “काही लोकांना वाटत होते आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असे त्या म्हणाल्या. “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल. तेव्हा संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापायचा आहे. मुंब्रातील प्रत्येक भागातून एमआयएमचे नगरसेवक निवडून आणायचे आहेत,” असे थेट आव्हान त्यांनी दिले. यावेळी त्यांनी मतदानाच्या आकडेवारीवर भाष्य करताना सांगितले की, मुंब्रा परिसरात नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून काही उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली. “शेराच्या पिल्लाला हरवण्यासाठी संपूर्ण गिधाडांची फौज तैनात केली, तरी काही उपयोग झाला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. सहर शेख यांच्या विजयामुळे मुंब्रा-कल्याण-ठाणे पट्ट्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.