Who gave Team India runners up medal : एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्याच्या निकालानंतर मैदानाबाहेर घडलेल्या एका घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे बक्षीस वितरण समारंभात भारतीय खेळाडूंनी राखलेले मोहसीन नकवी यांच्यापासूनचे अंतर. मैदानात पाकिस्तानचे वर्चस्व – अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दबावाखाली विखुरला आणि अवघ्या १५६ धावांत गारद झाला. या विजयासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा अंडर-१९ आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. मेडल सेरेमनीमधील प्रोटोकॉल आणि वाद – सामना संपल्यानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. एसीसी (ACC) चे विद्यमान अध्यक्ष मोहसीन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंनी नकवी यांच्या हस्ते मेडल स्वीकारले नाही. त्याऐवजी, भारतीय उपविजेत्या संघाला आयसीसी असोसिएट मेंबर्सचे चेअरमन मुबस्सिर उस्मानी यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले. हेही वाचा – Ayush Mhatre Reaction : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचं खापर भारतीय कर्णधाराने कोणावर फोडलं? जाणून घ्या यावेळी मोहसीन नकवी व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र ते भारतीय खेळाडूंपासून दूर उभे असल्याचे दिसून आले. वरिष्ठ भारतीय संघानेही यापूर्वी नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, त्याच पावलावर पाऊल ठेवत युवा संघानेही ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान दुसऱ्यांदा चॅम्पियन, भारताचा दबदबा कायम पाकिस्तानने हा सामना १९१ धावांनी जिंकत दुसऱ्यांदा आशिया चषक उंचावला. यापूर्वी बांगलादेश गतविजेता होता. पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४७ धावा केल्या होत्या, तर भारताचा डाव २६.२ षटकांतच संपुष्टात आला. हेही वाचा – BCCI : भारतीय दृष्टीहीन महिला संघाचा BCCIकडून सत्कार! सचिव देवजित सैकिया यांनी केली मोठी घोषणा अंतिम सामन्यातील हा पराभव भारतासाठी निराशाजनक असला तरी, या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ आजही सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत सर्वाधिक ६ वेळा अंडर-१९ आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या पराभवातून धडा घेत आता भारतीय संघ आगामी विश्वचषकासाठी सज्ज होणार आहे.