Mumbai Municipal Corporation Election । Bjp : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक आता खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) कंबर कसत असतानाच, दुसरीकडे महायुतीनेही मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी तगडी रणनीती आखली आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने स्टार प्रचारकांचे ‘कार्ड’ खेळण्याचे ठरवले आहे. भाजपचा ‘यूपी-बिहार’ पॅटर्न : मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक आहे, तिथे भाजपने बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर तसेच अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी, रवि किशन आणि निरहुआ या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतात मोठी सेंध लावण्याचा महायुतीचा विचार आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लोकप्रिय अभिनेते गोविंदा प्रचाराची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. जागावाटपाचा ‘१४०-८७’ फॉर्म्युला ठरला! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला बाजूला ठेवून युती करण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार, भाजप: १४० जागा शिंदे यांची शिवसेना: ८७ जागा लढणार आहे. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवली जाणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे पेच वाढणार? एककीडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मविआमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंमध्ये (उद्धव आणि राज ठाकरे) पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना आता निश्चित मानला जात आहे.