Padu machine | Raj Thackeray | Election : राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला निवडणुकीचा धडाका काल थांबला. उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा तांत्रिक निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनसोबत आता ‘पाडू’ (PADU) या नवीन यंत्राचा वापर केला जाणार आहे. काय आहे हे ‘पाडू’ (PADU) यंत्र? ‘पाडू’ म्हणजे ‘Printing Auxiliary Display Unit’ हे यंत्र प्रामुख्याने मतमोजणीच्या वेळी तांत्रिक मदत म्हणून वापरले जाते. मुंबई महानगरपालिकेसाठी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (BEL) कंपनीची ‘M3A’ प्रकारची ईव्हीएम यंत्रे वापरली जात आहेत. मतमोजणी दरम्यान जर मुख्य ‘कंट्रोल युनिट’मध्ये (CU) काही तांत्रिक बिघाड झाला किंवा निकाल पाहण्यात अडचण आली, तर या ‘पाडू’ यंत्राद्वारे निकालाचा डिस्प्ले पाहता येणार आहे. आयोगाचे महत्त्वाचे नियम आणि स्पष्टीकरण : निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, ‘पाडू’चा वापर सरसकट सर्वच ठिकाणी केला जाणार नाही. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या हे देखील पाहुयात… १. केवळ अपवादात्मक परिस्थितीत वापर: मतमोजणीत तांत्रिक अडचण आल्यास अत्यंत शेवटचा पर्याय म्हणून या यंत्राचा वापर होईल. २. तंत्रज्ञांची उपस्थिती: या यंत्राचा वापर केवळ ‘बेल’ (BEL) कंपनीच्या अधिकृत तंत्रज्ञांच्या उपस्थितीतच केला जाईल. ३. कठोर देखरेख: राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक आधीच दाखवण्यात आले आहे, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील. तब्बल ‘इतक्या’ केंद्रांवर पाडूची उपलब्धता? मुंबईतील मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण १४० ‘पाडू’ यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बॅलेट युनिट (BU) आणि कंट्रोल युनिट (CU) यांच्या जोडणीत अडथळा आल्यास ही यंत्रे मदतीला येतील. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ही केवळ एक तांत्रिक खबरदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या यंत्राचा वापर फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे. राज ठाकरेंचा सवाल? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, ईव्हीएमला नव्यानं कोणतं मशीन लावलं जाणार आहे? तसेच नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. लोकसभा, विधानसभेला प्रचाराचा जुना नियम बाहेर का काढला नाही? असाही प्रश्न त्यांनी केला.