रायगड : मतदानावेळी ईव्हीएम बिघाडाची स्थिती आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद पेटला आणि त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. रायगड मधील महाड नगरपरिषदच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्यानंतर, तुफान हाणामारी झाली. सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहीती आहे. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केला. यावरती भरत गोगावले म्हणाले, जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणाऱ्या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे गोगावलेंनी म्हटले. हल्ल्याच्या आरोपांवर सुनील तटकरे म्हणाले, निवडणुकीदरम्यान शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे. सकाळपासून काही युवा नेते मतदान केंद्रांत शिरत आहेत. मतदान केंद्रात प्रवेशाचा अधिकार केवळ अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधींनाच असतो. पण विकास गोगावले थेट केंद्रात जात असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. युतीधर्म सर्वांनीच पाळणे आवश्यक – अजित पवार युतीधर्माचा सर्वांनीच आदर करणे आवश्यक आहे. आपल्या लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही. निवडणूक ही एक प्रवित्र प्रकिया आहे. प्रत्येक मतदाराला कोणत्याही भितीशिवाय आपला मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे. जनतेने कोणाला निवडूण द्यायचे, हे त्यांना ठरवू द्या. शांतता भंग करण्याचा किंवा मतदारांवर बळजबरीने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न हा संविधान आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, असे अजित पवार रायगडमध्ये झालेल्या संघर्षाच्या संदर्भात म्हणाले. गेवराईमध्ये भाजप-राष्ट्रवादीत राडा गेवराई शहरातील स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यानंतर भाजप नेत्याच्या घराबाहेर दगडफेक करण्यात आली आहे. या हाणामारीनंतर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीमार देखील केला. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित व भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांमध्ये वार्ड क्रमांक 10 मधील बूथवर जोरदार वाद झाल्यानंतर, वादाचे रुपांतर हणामारीत झाले. पोलीसांनी प्रकरण शांत केल्यानंतर मतदान सुरुळीत पार पडले, असे पोलीस अधिक्षक नवनीत कॅंन्वर यांनी सांगितले.